वैशिष्ट्यीकृत पोस्ट

माझाही ब्लॉग असावा...

               मित्रांनो ... आयुष्य मिळाले आहेच तर त्याचा सदुपयोग करायलाच हवा.. नाही का ! संगणकाच्या माध्यमातून जग आपल्या अंगणापर्यंत आले आ...

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

झोंडगे टेलर

गावच्या मुख्य पेठेत रासने ताईंचे बांगड्याचे घरवजा दुकानाच्या पढवीतील ओट्यावर एका कोपऱ्यात वय साधारण ४५ वर्षे ,नाकावर जखमेचा व्रण ,अंगात टेरीकॉटच्या कापडाची चारपाच ठिकाणी भोके पडलेली  बिनबह्याची बंडी, त्यावर पँट हातामध्ये जुने घड्याळ,गळ्यात तुळशीमाळ दाढीमिशा कापसासारख्या पिकलेल्या,काळा  हेअरडाय  लावून डोक्यावरील उरल्या-सुरल्या केसांना काळे कुळकुळीत केलेले.. उजव्या हातात नाडा बांधलेला.. जुनी लाकडाची कर-कर  करणारी चारपायाची लाकडी खुर्ची..त्यावर झेंड्यातून उरलेल्या भगव्या कापडाची खोळ असलेली उशी...आणि सासऱ्याकडून बायकोबरोबर आहेरात आलेली संगम कंपनीची शिलाई मशीन आणि रेडीओ ..गिऱ्हाईकाला बसायला खुर्चीही ताईंचीच. भाडे म्हणाल तर .. अं.. हं... टोटल फ्री...असा लवाजमा असणारा  झोंडगे टेलर आणि त्याचा वर्षानुवर्षापासून चालू असलेला व्यवसाय.
ताईंचे दुकानाला जुन्या पद्धतीच्या  दुमडता येणाऱ्या बिजागर्याच्या लाकडी फळ्यांच्या झडपा आणि त्याला लोखंडाच्या दोन पट्ट्यांनी कोयंड्यात बसवून कुलूप लावण्याची सोय.सकाळी आल्यानंतर कुलूप उघडून लोखंडी पट्टी धडकन आदळली की पेठेतल्या लोकांना झोंडगे टेलर आल्याची चाहूल लागायची.  फळ्या दुमडून लावायच्या, केरसुणी घेऊन स्वतःच्या मशीनपुरते चार-दोन झाडू मारायचे  आणि दुकानातील कोपऱ्यात असलेली मशीन, खुर्ची,शिवायला आलेले नवे-जुने कपडे,ब्लाउज,बंड्या,चोळ्या बांधून ठेवलेले गाठोडे ठेवलेले असायचे.त्यातून मशीन,खुर्ची,उशी आणि गरजेपुरते सामान बाहेर काढायचे.तोपर्यंत ताई बाहेर आलेल्या असायच्या.माशिनपुरतेच झाडलेले बघून
 'कसं झाडून घेतो रे झोंडग्या.., केरसुणी झिजती का काय? '
 तेव्हढ्याच मिश्किलपणे हसत 'आता अजून कसं झाडायचं ? वाऱ्या-वावधानानं उडतोच कचरा ...'
'तू तं लई शान्हा हे बबा...' असा ताई म्हणायच्या .
'बरं बरं ! .. उद्या झाडीन चांगलं..'
हा संवाद नेहमी ठरलेला असे.परंतु त्याची ती उद्या कधी उगवतच नसे.मग तो शेजारील रतिलालकाकाच्या दुकानातून एक रुपयाच्या उदबत्त्या घेऊन जवळच असलेल्या राममंदिरामध्ये पूजा करायला जायचे.तेथे लाऊडस्पीकर असल्याने याची पूजा अर्धातास तरी उरकत नसे.अगदी याच्या आवाजाने पूर्ण पेठ जागी होईपर्यंत.पेठेमध्ये जैनांचीच जास्त घरे असल्याने म्हणा किंवा झोंडग्याच्या आवाजामुळे कोणाला जाग येण्यासाठी कोंबडा पाळायची गरजच लागली नाही.
पूजा करून आला की याच्या मशीनचे चाक बिंगायचे ... तेवढ्यात एक गिऱ्हाईक पत्र्याच्या खुर्चीवर येऊन बसतो.बरोबर आणलेल्या पिशवीतून जुनी पँट काढून लाकडी फळीवर ठेवतो.झोंडगे टेलर त्रासिक मुद्रेने त्याला विचारतो.
टेलर-'काय रे !... ,काय करायचं ?'
गिऱ्हाईक -'टीपा मारायच्यात !'
(ती पँट उलटी-पालटी  करून डोके खाजवत ) 'पंधरा रुपये व्हतेल ! , शिवू  का?'
गिऱ्हाईक -'काय ?.., पाच रुपड्याच्या कामाचे पंधरा रुपये? ; बावचळला की काय?'
(ती पँट खेकसत गिऱ्हाईकाच्या अंगावर  फेकत) 'पटत आसन तर सांग,मला हे झंपर अर्जंड शिवायचं हे !' आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा ब्लाउज शिवायला घेतो.
गिऱ्हाईक -'तुला जास्त झालं भो ; धंद्याची गरज नाई र्हायली तुला..' 'बरं ..दहा रुपये घी..'
'आता नाही व्हायची, शिवून ठुतो...उद्या घेऊन जा !'
गिऱ्हाईक -'बरं..बरं ! चांगली शिव बरकां ,नैतर दादाच्या धोत्रासारखं व्हायचं !', 'तोंडमागलं मोल घेतो अन भोक्शे तसेच ठुतो !'
(टेलर तावातावात)' आरं एव्हढं जुनं धोतर झालंय ते!,लई लाज वाटती तर नवं घेऊन दि ना मंग!'
गिऱ्हाईक -'लई शान्हा ,पावसाचा पत्ता नई ... इथं खायचे वांधे झालेत अन म्हणी नवं घी ! ,'ऐ ते जावदी.., पँट चांगली शिव बरकां ! ,येऊ का?" (आणि निघायला लागतो)
तेवढ्यात टेलर त्याला म्हणतो,'तंबाखू दी बरं... लई तल्लप झाली."
गिऱ्हाईक  -फुकट्या झवण्या...इकत घेत जय ना कधीतरी..,पाच रुपये कमी करायला जीव जातो ...(खिशातून विंचवाचे चित्र छापलेली पुडी टेलरच्या हातावर आपटतो )
टेलर-'पुडी मी जवळ ठेवीत नै... जवळ असली की जास्त खातो'
गिऱ्हाईक -'गप बाता नको हाणू ,लोकाचं खाऊ अन आपलं व्याजी लाऊ..'
टेलर-''माहित हे मला ..तू लई राजा हरीचन्द्राची अवलाद हे, तू काय गावजेवण घालून दमलाय..., पुडी दिली चुना पान दि ना; च्यायला जेवायला वाढतो आन पाणी म्हणी शेजार्याच्या इथं प्या म्हणतो!'
गिऱ्हाईक -'हां घी ना..,तुझं जेवण तर इथंच झालं आसन ...सप्ता चालू हे राम मंदिरात .., तुला तं चुलबंद आवतनं आसल, च्यायला एक बी सप्ता सोडीत नै तू ! कधी पारायण वाचितो का कधी ? नुसताच जेवायला जातो !'
रावणासारखा जोरजोरात हसत टेलर म्हणतो,
'अरे मंग लोकं पंगती देतेतच कशाला..? खायलाच ना!'
             असा हा चतुर झोंडगे टेलर...त्याचे काम चालते ते बारा वाजेपर्यंत.बारा वाजता जेवण करायला गेला की तो यायचा एक वाजता तो पर्यंत मशीनवर ऊन आलेले असायचे.फाटकी घोंगडी घेऊन पढवीतील लाकडी खांबांना ठोकलेल्या खिळ्यांना लटकवायची.समोर असलेल्या चप्पल दुकानातून जो मिळेल तो पेपर आणायचा आणि वाचता-वाचताच तोच पेपर तोंडावर घेऊन ढाराढूर घोरायला लागायचा.तीन वाजता उठायचा तोंड ओंबाळून जो दिसेल त्याला हाक मारून त्याच्याकडून गायछाप तंबाखू मागून विडा मळून तोंडात टाकला की पुन्हा काम चालू.
             काम चालू असताना त्याचा रेडिओही चालू असायचा.त्याचे कायमचे सोबती म्हणजे श्रीमल वर्मा उर्फ शिरुकाका आणि आलोक शर्मा.टेलर जरी गावाला चुना लावायचा तरी शर्मा आणि शिरुकाका मात्र त्याचा पिच्छा पुरवत असत. शिरुकाका म्हणजे एकदम फेमस माणूस.त्यांचे बिडी,अन  हातभट्टीवर विशेष प्रेम.शिरुकाकांना अपत्य नसल्याने व त्यामुळे आपल्या व मुलांच्या भवितव्याची चिंता नसल्याने त्यांचा मुक्काम फक्त टेलरजवळ गयाबाईची किंवा बाबुनानाची हातभट्टी या तीनच ठिकाणी असे. हा..... यार ! हा काकाचा तकिया कलाम .त्यांच्या पुतण्या सोने चांदीचा व्यापारी असल्याने ते जे देतील आणि शिरुकाकाची सौभाग्यवती जे काही करील त्यावरच  यांचा उदरनिर्वाह चाले.एव्हढे असूनही ती बिचारी कायम याचा त्रास सहन करायची.शिरुकाकाचा टांगा एकदा पलटी झाला की धुमाकूळ ठरलेलाच असायचा.नको त्या शिव्या आणि मारहाणही .सगळ्या पेठेत याचा आवाज घुमायचा.
           टेलरचा दुसरा सोबती आलोक शर्मा... हा आलोक शर्मा दहाएक वर्षांपूर्वी कोठूनतरी आलेला.त्याची बोलीभाषा हिंदी.त्याच्या सर्वांगावर अगणित वारांचे किंवा जखमांचे व्रण. कोठूनतरी जीवाच्या आकांताने पळून आलेला असावा बहुतेक.परंतु त्याचे हस्ताक्षर नजर लागावी असे सुंदर कोणीही गमतीने त्याला पेनकागद  देऊन मराठी किंवा हिंदी शब्द बोलताच तो सफाईदारपणे तो शब्द रनिंग लिपीमध्ये लिहायचा.त्याला सर्व पेठ खूप जीव लावायची.तेथील रहिवासी त्याला जेवण किंवा गोडधोड खायला, आपले जुने कपडे द्यायचे.तो  जेवणाबरोबर नेहमी चार-सहा हिरव्या मिरच्या खायचा. या शर्माची सवय म्हणजे याने एकदा अंगात कपडे घातले की ते फाटेस्तोवर काढत नसे.दाढी आणि डोक्याचे केस वाढले की कोणीतरी चार-दोन महिन्यातून जग्गू न्हाव्याला सांगून त्याची हजामत करून घेत असे.
             शर्माला चहा आणि बिडीचे  भारी व्यसन.पेठेतून येणाऱ्या-जाणार्यांना तो 'बाबूजी... चाय पीनी है ;ठीक है ' असे एक हात पुढे तर एक हात दाढी खाजवत थोडी मान तिरकी करत मागायचा.त्याला कोणी दोन तर कोणी पाच  रुपये देत असे.मग तो रतिलाल काकाच्या दुकानातून दोन रुपये देऊन  बिड्या  तर  महंमद भाईच्या हॉटेलमध्ये पाच रुपये देऊन चहा घ्यायचा .महंमद भाईने त्याचा अवतार पाहून त्याला काचेचा ग्लास कायमस्वरूपी भेट केलेला होता. शर्मा त्यातच चहा ओतून  घेत असे.चहाचा ग्लास भरून घेतला की तो सरळ झोंडगे टेलरच्या मशिनजवळ जाऊन बसायचा .टेलरला 'ठीक है?'म्हणत बिडी पेटवायचा एका हाताने बिडीचा ओढून धूर काढायचा तर दुसर्या हाताने चहाचा घोट घ्यायचा.बिडीची राख त्या चहामध्ये टाकून तो चहा ढवळून-ढवळून प्यायचा.असा त्याचा राजेशाही थाट असायचा.शिरुकाकाजवळील  बिड्या संपल्या म्हणजे तो शर्माकडे चेष्टेने दमदाटी करून बिडी मागायचा.शर्माही त्याला  'कैसे?... ठीकहै ? म्हणत विरोध करायचा .. बरंच वेळ खडाजंगी झाल्यानंतर शर्मा त्याला एक बिडी द्यायचा.आणि मग ते दोघे गुण्यागोविंदाने बिडी प्यायचे...

रविवार, ३ जानेवारी, २०१६

माझाही ब्लॉग असावा...

               मित्रांनो ... आयुष्य मिळाले आहेच तर त्याचा सदुपयोग करायलाच हवा.. नाही का ! संगणकाच्या माध्यमातून जग आपल्या अंगणापर्यंत आले आहे... हां , अंगण दुरावत चाललेय हेही चुकीचे नाहीच.परंतु हा अविष्कार सुखावणारा नक्कीच आहे.जोवर जीवन आहे तोपर्यंत जगून घ्यायचे... हाय काय अन नाय काय ! ते एक गीत आहे बघा...

                                               'सजन रे झूठ मत बोलो ,
                                                                खुदाके पास जाना है |
                                              न हाथी है न घोडा है,
                                                             वहां  पैदल ही  जाना है |

             आता यातील कल्पनाविलास सोडला तर आयुष्याचा सार या चार ओळींमध्ये आहे.परंतु आपण खरोखरच हा विचार कधी करतो का ? आपल्या जिंदगीची रफ्तारच अशी झालीये की ती आपल्याला जिंदगीबाबत विचारच करू देत नाहीये. आपली जिंदगी म्हणजे ना...
                                   'जिंदगी झंड है..
                                           फिर भी घमंड है |
              आपण जीवन जगता-जगता इतके पुढे आलो की विश्वासच बसत नाही. अन्न वस्त्र अन निवार्याच्या रहाटगाडग्यातच आपण फिरत राहिलो आणि काही जगता येण्यासारखे क्षणही आपल्या हातून निसटून गेले... आणि त्या  सर्वार्थाने जगता न आलेल्या क्षणांच्या भळभळत्या  जखमा उरात साठवून आपण आशेपायी चालतच आहोत आणि हाती आलेले क्षण निसटत आहेत...
                   आशा ही गाढवाच्या तोंडासमोर थोडे अंतर राखून बांधलेल्या घासाच्या पेंढीसारखीच आहे.. गाढव त्या पेंढीच्या आशेने चालतच राहते... मरेपर्यंत.  म्हणतात ना.., इच्छा सर्व दुःखांचे मूळ आहे. इच्छा किंवा अपेक्षा धरली आणि ते मिळाले नाही तर दुःख.... आजपर्यत जे जगलो ते याच पद्धतीने... आता थोड स्वतःसाठी म्हणून वाटले ,
      माझाही ब्लॉग असावा. ...
                                                                                      - बाळासाहेब भोसले


पहिली पोस्ट

नमस्कार मित्रांनो....
नवीन वर्षाचा संकल्प म्हणून मी या ब्लॉगची सुरुवात करत आहे...मी काही प्रथितयश लेखक नाही परंतु, जीवन जगात असताना जे काही अनुभव आले ते शब्दरुपाने येथे मांडणार आहे. मला कविता,गझल,आणि वास्तव जीवनावर लिहायला आवडते. आज सुरुवात करतोय...
बघूया काय होतंय ते...!
                                                                                  - बाळासाहेब भोसले